रायगड : एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) संदर्भात राज्यभरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांकडून कार्ड काढण्याची मुदत १४ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी अनेक वाहकांना त्याबाबत कोणत्याही सूचना मिळालेल्या नसल्याने प्रवाशांना प्रत्यक्ष बसमध्ये सवलत नाकारली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतील विसंगतीचा फटका थेट प्रवाशांना बसत आहे. अलिबाग बसस्थानकात कार्ड काढण्यासाठी गुरुवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. सकाळपासूनच कार्ड वितरण केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलतीच्या प्रवाशांची संख्या विशेषतः अधिक होती. अनेकांना तासन्तास रांगेत उभे राहूनही वेळ संपल्यामुळे कार्ड मिळाले नाही. काही ज्येष्ठ नागरिकांनी सलग तीन वेळा रांगेत उभे राहूनही नंबर न लागल्याची खंत व्यक्त केली. त्यामुळे सवलतीसाठी कार्ड काढायचे की कार्ड मिळवण्यासाठीच वारंवार रांगेत उभे राहायचे, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाकडून विविध प्रकारच्या प्रवास सवलती दिल्या जातात. यापूर्वी या सवलतींसाठी आधार कार्ड किंवा इतर शासनमान्य ओळखपत्र पुरेसे मानले जात होते. काही प्रवर्गांसाठी स्वतंत्र सवलत कार्डाची सुविधाही उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यामागील उद्देश आणि त्याची अंमलबजावणी याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम अधिक वाढला आहे. काही वाहकांकडून मुदतवाढीबाबत सूचना न मिळाल्याचे सांगून प्रवाशांकडून पूर्ण तिकीट आकारले जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवासी आणि वाहकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. एनसीएमसी म्हणजे ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ हे एक स्मार्ट कॅशलेस कार्ड असून सार्वजनिक वाहतुकीचे भाडे डिजिटल पद्धतीने भरण्यासाठी त्याचा वापर केला जातो. एसटी तिकीट व्यवहार अधिक सोपे, जलद आणि रोखरहित करण्याचा त्यामागील उद्देश आहे. मात्र कार्ड वितरणातील विलंब, अपुरी माहिती आणि अंमलबजावणीतील विसंगतीमुळे प्रवाशांचा त्रास वाढत असून, या संपूर्ण प्रक्रियेत समन्वय साधून स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.






