पुणे : पुण्यातील गणेशोत्सवात डीजे आणि कर्णकर्कश ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शहरातील वातावरण अधिकच तापले आहे. डीजेमुक्त गणेशोत्सवाची मागणी करणाऱ्या बापट यांना माध्यमांशी संवाद साधत असतानाच मारहाण करण्यात आल्याने या घटनेचा राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मात्र या घटनेनंतर केवळ निषेधापुरते न थांबता आता पुणेकरांनीही डीजे संस्कृतीविरोधात थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या या भूमिकेमुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यानंद बापट हे गणेशोत्सवात कर्णकर्कश डीजेवर बंदी घालण्याची मागणी सातत्याने करत होते. ध्वनीप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण तसेच विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी भूमिका घेतली होती. त्यांच्या या मागणीवरून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. काहींनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला, तर काहींनी तीव्र विरोध दर्शवला. या वादाच्या पार्श्वभूमीवर टिळक रोड परिसरात माध्यमांशी बोलत असतानाच संतोष चव्हाण या तरुणाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हा संपूर्ण प्रकार उपस्थित पत्रकारांच्या कॅमेऱ्यात कैद झाला. प्रसंगावधान राखत पत्रकार आणि कॅमेरामन यांनी तात्काळ हस्तक्षेप करून बापट यांची सुटका केली. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला हा हल्ला असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आणि डीजेमुक्त गणेशोत्सवाच्या समर्थनार्थ येत्या रविवारी (६ सप्टेंबर) पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. रविवारी सकाळी ११ वाजता बालगंधर्व चौकातील झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ नागरिकांनी एकत्र यावे आणि शांततापूर्ण पद्धतीने डीजेमुक्तीची मागणी करावी, असे त्यांनी सांगितले आहे. या मोर्चामध्ये विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी, ज्येष्ठ नागरिक आणि अनेक पुणेकर सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, विद्यानंद बापट यांनीही हल्ल्यानंतर आपली भूमिका कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. “सवंग प्रसिद्धीसाठी माझ्यावर हल्ला करण्यात आला असला, तरी डीजेमुक्त गणेशोत्सवासाठीचा लढा थांबणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. दुसरीकडे, हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी अधिक तीव्र होत असून, कायदा-सुव्यवस्था राखत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनानेही आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण, डीजे संस्कृती आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, यंदाचा उत्सव पारंपरिक, शांततापूर्ण आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची मागणी अधिक जोर धरताना दिसत आहे.






