पिंपरी : वाकड, चिखली आणि पिंपरी परिसरातील सुपरमार्टमध्ये तूप, काजू, बदाम यांसारख्या महागड्या किराणा वस्तूंवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार महिलांसह सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे ७ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रविकांत देवानंद जाकरे (३२), ब्रिजेश सिताराम मदेशिया (२५), ब्रिजेश बाळु यादव (३५), सोनम बाबू शेख (३५), सलमा शकील शेख (५१), सानिया बाबुमिया शेख (२०) आणि रूमा ब्रिजेश मदेशिया (२७) यांचा समावेश आहे. यातील बहुतेक आरोपी मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील असून काही आरोपी पुणे परिसरातील आहेत. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वाकड येथील दत्त मंदिर रोडवरील स्टार सुपरमार्केटमध्ये २९ ऑगस्ट रोजी तसेच कलाटे वस्तीतील सुपरमार्केटमध्ये १२ ऑगस्ट रोजी चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी दुकानदारांचे लक्ष विचलित करून गोवर्धन तूप, काजू, बदाम आणि इतर महागड्या वस्तू लंपास केल्या होत्या. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे ४२ हजार १०० रुपयांच्या वस्तू चोरीला गेल्याची नोंद वाकड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. वारंवार घडणाऱ्या अशा चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वाकड पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली. घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे चोरीत वापरण्यात आलेली कार मुंबईच्या दिशेने गेल्याचे आणि त्यानंतर पुन्हा पिंपरी-चिंचवड परिसरात आल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून ताथवडे-वाकड परिसरातून संशयित कार आणि एक ऑटो रिक्षा ताब्यात घेतली. वाहनातील संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी सुपरमार्टमधील चोरीची कबुली दिली. तपासादरम्यान आरोपींकडून चोरीतील विविध वस्तूंसह वाहने असा एकूण ७ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील अनेक न उलगडलेल्या चोरीच्या घटनांचा छडा लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे तसेच पोलीस हवालदार आणि तपास पथकातील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केली. सुपरमार्टमध्ये महागड्या वस्तूंना लक्ष्य करणाऱ्या टोळीला अटक झाल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, शहरात अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिसांची करडी नजर कायम राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.






