मुंबई : गेटवे ऑफ इंडियाजवळ भर समुद्रात फेरीबोटीच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याने ३८ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र मुंबई पोलिसांच्या तातडीच्या प्रतिसादामुळे सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली. ही घटना ३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. ‘अन्वरी’ नावाची फेरीबोट पर्यटकांना समुद्र सफर घडवून गेटवे ऑफ इंडियाकडे परत येत असताना किनाऱ्यापासून सुमारे १.५ नॉटिकल मैल अंतरावर तिच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. रात्रीचा अंधार आणि समुद्रातील परिस्थितीमुळे बोट पुढे सरकू शकत नव्हती. त्यामुळे बोटीवरील प्रवाशांमध्ये काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बोटीवर एकूण ३४ प्रवासी आणि ४ कर्मचारी असे मिळून ३८ जण उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाने तत्काळ बचाव पथकाला सतर्क केले. बिट क्रमांक ०१ चे पोलीस शिपाई अभिजित शिंदे आणि पोलीस निरीक्षक गुरव यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. याच परिसरात असलेल्या ‘आझाद हिंद’ फेरीबोटीशी वायरलेसद्वारे संपर्क साधण्यात आला. तिचे मालक जुनेद मुल्ला यांनी कोणताही विलंब न करता मदतीसाठी बोट पाठवली. ‘आझाद हिंद’ बोटीने बंद पडलेल्या ‘अन्वरी’ फेरीबोटीला टोइंग करून रात्री ९.१० वाजता गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टी क्रमांक २ वर सुरक्षित आणले. त्यानंतर सर्व ३८ प्रवाशांना सुखरूप किनाऱ्यावर उतरवण्यात आले. या संपूर्ण बचाव मोहिमेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबई-अलिबाग जलमार्गावरील फेरीबोट सेवा नुकतीच पावसाळी विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झाली आहे. १ सप्टेंबरपासून मेरीटाईम बोर्डाने मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावरील प्रवासी बोटसेवेला पुन्हा परवानगी दिली आहे. मुंबई आणि अलिबाग यांना जोडणारा हा सर्वात जलद आणि सोयीस्कर मार्ग मानला जातो. दरवर्षी पावसाळ्यात साधारण तीन महिने ही सेवा बंद ठेवली जाते. त्यामुळे पर्यटन आणि स्थानिक प्रवाशांवर त्याचा परिणाम होत असतो. सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर मोठ्या संख्येने पर्यटक आणि प्रवासी या मार्गाचा वापर करत आहेत. वर्षभरात सुमारे १५ लाखांहून अधिक प्रवासी या जलमार्गाने प्रवास करतात. पीएनपी, मालदार, अजंठा आणि अपोलो अशा विविध कंपन्यांच्या फेरीबोटी या मार्गावर नियमित धावतात. साधारण प्रत्येक अर्ध्या तासाला एक फेरीबोट सुटते, तर गर्दीच्या काळात फेऱ्यांची संख्या वाढवली जाते. स्पीडबोट किंवा रो-रो सेवांच्या तुलनेत फेरीबोट प्रवास सर्वसामान्यांसाठी अधिक किफायतशीर मानला जातो. मात्र अशा घटना घडल्यास प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येतो. त्यामुळे फेरीबोटींची नियमित तांत्रिक तपासणी, समुद्रातील आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करणे, बचाव साहित्याची उपलब्धता आणि तातडीच्या प्रतिसादासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक असल्याची मागणी प्रवासी आणि तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. मुंबई पोलिसांनी दाखविलेली तत्परता कौतुकास्पद असली, तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जलवाहतूक व्यवस्थेत अधिक सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित झाली आहे.






