मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती अधिक सक्षम करण्यासाठी केवळ उत्पन्न वाढविण्यावर भर न देता खर्चातही काटकसर करणे आवश्यक असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना पारंपरिक कार्यपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्याचे निर्देश दिले. विशेषतः ‘विना वाहक’ बससेवेला प्राधान्य देत मनुष्यबळावरील खर्च कमी करण्याबरोबरच प्रवाशांना अधिक सुलभ, जलद आणि आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित होते. एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधणे, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि उपलब्ध मनुष्यबळ व संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर करणे या तिन्ही बाबींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले. केवळ तिकीटदर वाढवून आर्थिक प्रश्न सुटणार नाहीत, तर प्रवाशांना अधिक चांगली सेवा देत उत्पन्न वाढवणे आणि त्याचवेळी खर्च कमी करणे हाच शाश्वत मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विना वाहक बससेवेच्या माध्यमातून काही मार्गांवरील वाहकांचा खर्च कमी होऊ शकतो. यासाठी डिजिटल तिकीट प्रणाली, क्यूआर कोड, स्मार्ट कार्ड आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ही सेवा अधिक सक्षम करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या भविष्यातील योजनांमध्ये प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवण्यावर विशेष भर दिला. एसटीचा आर्थिक तोटा कमी करण्याबरोबरच प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांच्या गरजा, बदलती प्रवास पद्धती आणि स्थानिक मागणी लक्षात घेऊन प्रवासीभिमुख योजना राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. वेळेत, सुरक्षित, स्वच्छ आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे ही एसटीची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगताना “प्रवासी समाधानी तर एसटीची आर्थिक गाडी रुळावर” या दृष्टिकोनातून भविष्यातील नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. एसटी ही केवळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे महामंडळाचे आर्थिक बळकटीकरण करताना प्रवाशांच्या हिताशी कोणतीही तडजोड न करता आधुनिक, कार्यक्षम आणि किफायतशीर सेवा देण्यावर भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि स्पर्धात्मक बनविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, खर्चावर नियंत्रण आणि प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा या त्रिसूत्रीच्या आधारे पुढील काळात विविध सुधारणा राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सूचित केले. अशा उपाययोजनांमुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






