पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ‘डीजे’च्या वापरावरून सुरू असलेल्या चर्चेला आता अधिक वेग आला आहे. ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर नागरिकांकडून डीजेविरोधात आंदोलने होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना कोणत्याही वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पुण्यात भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी डीजेच्या वापराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत येतो. ध्वनीक्षेपकांना रात्री १० वाजेपर्यंत की १२ वाजेपर्यंत परवानगी द्यावी, तसेच मिरवणुकीदरम्यान अतिरिक्त वेळेची मुभा द्यावी की नाही, यावर विविध स्तरांतून चर्चा सुरू असते. यंदा पुण्यात विद्यानंद बापट यांनी डीजेच्या वापरामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा ठळकपणे मांडल्यानंतर हा विषय अधिक चर्चेत आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पुण्यात गणेशोत्सवात डीजे वाजला पाहिजे की नाही, या वादात पडण्यापेक्षा पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, हे दाखवून द्यावे. पुण्यात ही क्षमता आहे आणि हे फक्त पुणेकरच करू शकतात.” त्यांनी पुणेकरांना पारंपरिक आणि सांस्कृतिक वातावरणात उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. दरम्यान, शहरातील विविध भागांत गणेशोत्सवादरम्यान डीजेच्या वापराविरोधात आंदोलने सुरू आहेत. कोणत्याही धर्माचा सण असला तरी कर्णकर्कश आवाज नको, अशी भूमिका आंदोलक नागरिकांनी घेतली आहे. ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. डीजेविरोधातील भूमिकेमुळे ३७ वर्षीय विद्यानंद बापट हेही चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. बीपीओ क्षेत्रात कार्यरत असलेल्या बापट यांची कोणतीही राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी गणेशोत्सवातील डीजेच्या वापराला ठाम विरोध केला आहे. त्यांच्या भूमिकेशी काही गणेश मंडळ कार्यकर्ते असहमत असल्याने त्यांना एका बैठकीतून बाहेर काढण्यात आले होते. या घटनेनंतर झालेल्या खडाजंगीमुळे बापट यांचे नाव डीजेविरोधी चर्चेत अधिक ठळक झाले. भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनीही गणेशोत्सव आणि दहीहंडीसारख्या सणांमध्ये डीजेच्या वापराला तीव्र विरोध दर्शविला आहे. मोठ्या आवाजामुळे आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना त्रास होत असल्याने गणेश मंडळांनी डीजे आणि स्पीकर्सचा वापर टाळावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. धार्मिकता सिद्ध करण्यासाठी रस्त्यावर धांगडधिंगा आवश्यक नसल्याचे सांगत, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा मूळ उद्देश जपण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली आहे.





