अहिल्यानगर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी आणि थकीत वीजबिलांबाबतची आश्वासने सरकारने पूर्ण करण्यास सुरुवात केली असून, भविष्यात वर्षातील ३६५ दिवस शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज उपलब्ध करून देण्याचा तसेच तब्बल ५८ हजार कोटी रुपयांची थकीत वीजबिले माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. राहाता येथे गंगागिरी महाराजांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विठ्ठलराव लंघे, अमोल खताळ, आशुतोष काळे, विवेक कोल्हे, रमेश बोरनारे, महंत रामगिरी महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. फडणवीस यांनी सांगितले की, शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने सरकारने दिलेला कर्जमाफीचा शब्द पाळला आहे. आतापर्यंत १२.५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली असून, एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दर पंधरा दिवसांनी नवीन पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज मिळत असून, आगामी काळात सर्व शेतकऱ्यांना वर्षभर १२ तास मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी धार्मिक आणि सामाजिक विषयांवरही भाष्य केले. राज्यात विजय मिळविण्यामागे सनातन आणि आध्यात्मिक शक्तीचे आशीर्वाद असल्याचा दावा करत त्यांनी संतांच्या विचारांवर आघात करणाऱ्या किंवा त्यांना धमक्या देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला. अशा प्रवृत्तींची कोणतीही गय केली जाणार नसून गरज पडल्यास त्यांना थेट नेस्तनाबूत केले जाईल आणि कोणाच्याही केसालाही धक्का लागू दिला जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी हरिनाम संकीर्तनामुळे समाजात एकात्मता, समता आणि अध्यात्माची भावना वृद्धिंगत होत असल्याचे नमूद केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखंड हरिनाम सप्ताहाला समाजाला एकत्र आणणारा आणि संस्कारांची ऊर्जा देणारा अलौकिक सोहळा असे संबोधले. ‘गावची एकी तर देवाची कृपा नक्की’ याचा प्रत्यय या सप्ताहातून येत असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहील, अशी ग्वाही दिली. तसेच सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आषाढी आणि कार्तिकी वारीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहालाही राज्य सरकारने अधिकृत राज्यमान्यता द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.





