ठाणे : राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘माय भारत’ (MY Bharat) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी आभासी संवाद साधणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील बी. के. बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, कल्याण आणि सेवा सदन कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, उल्हासनगर-३ या दोन निवडक महाविद्यालयांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती ‘माय भारत’च्या ठाणे जिल्हा युवा अधिकारी मनिषा शर्मा यांनी दिली. या संवाद कार्यक्रमात संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) स्वयंसेवक, युवक-युवती तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांशी थेट आभासी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून, खेळ, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि सक्रिय नागरिक म्हणून सहभागाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, क्रीडा क्षेत्रातील समर्पण, चिकाटी, तंदुरुस्ती आणि उत्कृष्टतेचे महत्त्व समजावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘माय भारत’, राष्ट्रीय छात्र सेना (NCC) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या स्वयंसेवकांना खेळ, तंदुरुस्ती आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण क्रीडा स्पर्धा, सामुदायिक तंदुरुस्ती कार्यक्रम, जनजागृती मोहिमा, सर्वसमावेशक क्रीडा उपक्रम तसेच युवकांच्या नेतृत्वाखाली राबवता येणाऱ्या फिटनेस उपक्रमांबाबत सूचना मागविण्यात येणार आहेत. प्राप्त झालेल्या सर्वोत्तम कल्पनांची निवड करून त्यांचा राष्ट्रीय स्तरावर विचार व अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे युवकांना केवळ कार्यक्रमात सहभागी होण्याचीच नव्हे, तर देशातील क्रीडा आणि तंदुरुस्ती चळवळीला बळकटी देण्यासाठी आपले योगदान देण्याचीही संधी मिळणार आहे. भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कल्याण आणि उल्हासनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास ‘माय भारत’च्या जिल्हा युवा अधिकारी मनिषा शर्मा यांनी व्यक्त केला.






