मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी व्यवहारिक मराठीत संवाद साधणे अनिवार्य करणाऱ्या निर्णयाची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली असून, राज्यभर तपासणी मोहिमेला वेग आला आहे. परिवहन विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत ८,२१७ चालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १,२६८ चालकांना व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे नोटीस बजावण्यात आली आहे. या चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत आवश्यक व्यवहारिक मराठी आत्मसात न केल्यास संबंधित चालकांचा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबई महानगर क्षेत्रात झालेल्या तपासणीत ३,९९५ चालकांची पडताळणी करण्यात आली. त्यापैकी ६०४ चालकांना मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्याचे आढळून आले आणि त्यांना नोटीस देण्यात आली. तर मुंबईबाहेरील राज्यातील विविध भागांत ४,२२२ चालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६६४ चालकांवर नोटीसची कारवाई करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार, राज्यभरातील एकूण तपासणीत १,२६८ चालकांना सुधारणा करण्याची संधी देण्यात आली आहे. परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, या कारवाईचा उद्देश कोणावर भाषेची सक्ती करणे नसून, प्रवासी आणि चालक यांच्यातील दैनंदिन संवाद सुलभ व्हावा, हा आहे. त्यामुळे प्रथम नोटीस देऊन सुधारणा करण्यासाठी वेळ दिला जात आहे आणि त्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे.
रिक्षा, टॅक्सी आणि इतर व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान असावे, ही भूमिका परिवहन विभागाने यापूर्वीच स्पष्ट केली होती. एप्रिल २०२६ पासून या विषयावर चर्चा सुरू झाली आणि चालकांना मराठी शिकण्यासाठी प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला. मराठी भाषा विभाग तसेच विविध साहित्यिक संस्थांच्या सहकार्याने चालकांसाठी दैनंदिन व्यवहारातील मराठी शिकविण्याची विशेष मोहीमही राबविण्यात आली. त्यानंतर जुलै २०२६ मध्ये महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये आवश्यक सुधारणा करून व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी व्यवहारिक मराठीची अट अधिक स्पष्ट करण्यात आली. १६ ऑगस्टपासून या नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून, त्यानंतर प्रत्यक्ष तपासणी मोहिमेला वेग देण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वीच चालकांना १६ ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आल्याचे सांगितले होते. चालकांनी घरी मराठी बोलणे अपेक्षित नसून, प्रवाशांशी आवश्यक तेवढा व्यवहारिक संवाद साधता येणे इतकेच आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आता ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत राज्यभर ही विशेष तपासणी मोहीम सुरू राहणार आहे. या कालावधीत मराठीचे ज्ञान अपुरे असल्याचे आढळल्यास संबंधित चालकाला प्रथम नोटीस देऊन एक महिन्याची अंतिम संधी दिली जाईल. त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास संबंधित चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल. त्यामुळे ही मोहीम केवळ भाषेच्या आग्रहापुरती मर्यादित न राहता प्रशिक्षण, तपासणी, सुधारणा आणि त्यानंतरची कायदेशीर कारवाई अशा टप्प्यांमध्ये राबविण्यात येत असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.






