नाशिक : देशभरात १५ ऑगस्ट रोजी ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात मात्र स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या नवजात बालकांचे तिरंग्याच्या तीन रंगांच्या कपड्यांमध्ये स्वागत करून त्यांच्या जन्माचा आनंद देशभक्तीच्या रंगात साजरा करण्यात आला. या अनोख्या उपक्रमामुळे रुग्णालयात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. नवजात बालकांना तिरंग्याच्या रंगांमध्ये सजविल्यानंतर डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि पालकांनीही हा क्षण मोठ्या आनंदाने अनुभवला. बालकांच्या कुटुंबीयांसाठी हा दिवस कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय ध्वजाला मानवंदना देत देशभक्तीचा संदेशही देण्यात आला. या उपक्रमामुळे रुग्णालयातील वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले. नाशिक जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील सर्वात मोठे नवजात अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) कार्यरत असून, येथे दरवर्षी सुमारे साडेतीन ते चार हजार नवजात बालकांवर उपचार केले जातात. कमी वजनाची, मुदतपूर्व जन्मलेली तसेच ग्रामीण भागातून उपचारासाठी दाखल होणारी नवजात बालके येथे उपचार घेतात. याशिवाय बेवारस अवस्थेत आढळलेल्या नवजात शिशूंवरही या केंद्रात उपचार करण्यात येतात, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. दिनेश ठाकूर यांनी दिली. दरम्यान, स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात शासकीय ध्वजारोहण सोहळाही उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिककरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याचे आवाहन केले. एका बाजूला रुग्णालयात नवजात बालकांच्या स्वागताचा अनोखा उपक्रम आणि दुसऱ्या बाजूला शासकीय ध्वजारोहणाचा उत्साह अशा देशभक्तीपूर्ण वातावरणात नाशिकमध्ये यंदाचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.






