मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यासाठी मुंबई महापालिकेने यंदाही ऑनलाइन एक खिडकी प्रणाली सुरू केली आहे. मंडप उभारण्यासाठी रस्ते किंवा पदपथावर खड्डे खणण्यास मनाई असून, नियमांचे उल्लंघन केल्यास प्रति खड्डा २ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. यंदाच्या दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी महापालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
मुंबईत सुमारे १० ते ११ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी सुमारे दोन ते तीन हजार मंडळे रस्ते किंवा पदपथावर मंडप उभारून उत्सव साजरा करतात. या मंडळांना महापालिका, पोलीस आणि वाहतूक पोलिसांची परवानगी आवश्यक असते. ही प्रक्रिया एकाच ठिकाणी पूर्ण करण्यासाठी एक खिडकी पद्धत लागू करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी गेल्या तीन वर्षांत सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा महाप्रकल्प हाती घेतला आहे. महापालिकेच्या अखत्यारितील २,०५० किलोमीटर रस्त्यांपैकी सुमारे १,९०० किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे हे रस्ते कोणत्याही कारणासाठी खोदण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. मंडप उभारण्यासाठी खड्डे खणण्याचे प्रकार टाळण्यासाठी दंडाची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. गेल्या वर्षी दंडात मोठी वाढ करण्यात आली होती. मात्र, विरोधानंतर तो २ हजार रुपये प्रति खड्डा इतकाच ठेवण्यात आला. यंदाही हीच रक्कम लागू राहणार आहे. मंडपासाठी अर्ज करताना मंडळांना भरावी लागणारी अनामत रक्कमही यंदा १०० रुपये ठेवण्यात आली आहे. पूर्वी ही रक्कम २० हजार रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत होती. मंडळांनी खड्डे न बुजवल्यास त्यासाठीचा खर्च या रकमेतून वसूल केला जात असे. दरम्यान, रस्ते किंवा पदपथ खराब होऊ नयेत यासाठी खड्डेविरहित मंडप उभारणीच्या तंत्राचा वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. मूर्तिकारांनाही नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.






