वृत्तसंस्था : पश्चिम आशियातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने नवे वळण घेतले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकेने इराणवर मोठी लष्करी कारवाई करत ८० हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिली आहे. अमेरिकेच्या मते, या कारवाईत इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, रडार केंद्रे, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या अनेक लढाऊ नौका, क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रे आणि लष्करी नियंत्रण कक्षांना लक्ष्य करण्यात आले. याचवेळी अमेरिकेने इराणला तेल विक्रीसाठी देण्यात आलेली विशेष परवानगीही रद्द केली असून त्यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींनंतर तुर्कीतील अंकारा येथे आयोजित नाटो परिषदेत बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा तात्पुरता युद्धबंदी करार संपल्याची घोषणा केली. इराणसोबत चर्चा करण्यास प्रतिनिधी तयार असले तरी त्या चर्चेतून काही निष्पन्न होईल, अशी अपेक्षा नसल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांवरील हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव पुन्हा वाढल्याने जागतिक तेलबाजार आणि समुद्री व्यापारावरही त्याचे परिणाम दिसून येत आहेत.
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनेही प्रत्युत्तरात्मक कारवाईचा दावा केला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले केल्याचा दावा केला असून, बहरीनमधील अमेरिकेच्या पाचव्या नौदल तळासह कुवेतमधील ‘अली अल सालेम’ हवाई तळाला लक्ष्य करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच अमेरिकेचे एक एमक्यू-९ ड्रोन पाडल्याचाही दावा इराणने केला आहे. अमेरिकेच्या कारवाईला उघड आक्रमकता संबोधत इराणच्या लष्करी नेतृत्वाने योग्य वेळी सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे. दरम्यान, या संघर्षामुळे पश्चिम आशियातील सुरक्षेची परिस्थिती अधिक गंभीर बनली असून जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे. विविध देशांनी दोन्ही राष्ट्रांनी संयम बाळगून पुन्हा राजनैतिक मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केले आहे. तणावामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींमध्येही चढ-उतार सुरू झाले असून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.







