पुणे : राज्यातील अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्ट्या किंवा वेळेत बदल होण्याची चर्चा सुरू असताना, शिक्षण विभागाने मात्र वेगळ्याच कारणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यासह राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा ३० जुलैपर्यंत सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय पावसामुळे नव्हे, तर राज्यभर सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला गती देण्यासाठी घेण्यात आला आहे. या संदर्भात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना परिपत्रक जारी केले आहे. राज्यात मतदार याद्यांचे पुनरीक्षण युद्धपातळीवर सुरू असून अनेक शिक्षकांची ‘मतदान केंद्रस्तरीय अधिकारी’ (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या शिक्षकांना मतदार यादीच्या कामासाठी पुरेसा वेळ उपलब्ध व्हावा, यासाठी शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी शाळांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ३० जुलैपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार, बीएलओ म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या अध्यापनाच्या तासिका शक्य तितक्या कमी ठेवाव्यात आणि त्यांचे वेळापत्रक सकाळी सलग तासांचे ठेवावे, जेणेकरून त्यांना दुपारच्या सत्रात मतदार यादी पुनरीक्षणाचे काम करता येईल. तसेच ज्या शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती झालेली नाही, त्यांनी संबंधित शिक्षकांच्या शालेय जबाबदाऱ्यांमध्ये सहकार्य करून अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्याचे निर्देशही परिपत्रकात देण्यात आले आहेत. या संदर्भातील सूचना शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना पाठविण्यात आल्या आहेत. दरम्यान, या निर्णयाबाबत शिक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काही शिक्षकांनी अतिरिक्त कामाच्या भाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. शिक्षक महासंघाचे अनिल बोरनारे यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिक्षकांवर वाढणाऱ्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.







