मुंबई : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर करत विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही भागांत उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ७ जुलै रोजी पालघर, नाशिक घाट आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्याच दिवशी मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाट, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, वाशीम, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला होता. तसेच ठाणे, नाशिक, नंदुरबार, बुलडाणा, अकोला, सातारा घाट, अमरावती आणि रायगडच्या काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. या भागांमध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता वर्तविण्यात आली होती.
८ जुलै रोजी पालघर, नाशिक घाट, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, बुलडाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम राहणार असून पुणे घाट आणि सातारा घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ९ जुलै रोजी रत्नागिरी, सातारा घाट, पुणे घाट, खंडाळा घाट, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे यलो अलर्ट राहील. त्यानंतर १० जुलै रोजी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट कायम राहणार असून ११ जुलै रोजी अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना हवामानातील बदल लक्षात घेऊन अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.







