पुणे : भीमाशंकर मंदिर येथे सुमारे पाच महिन्यांनंतर भाविकांसाठी विनापास दर्शन व्यवस्था पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार गुरुवारपासून सकाळी सात ते अकरा या वेळेत भाविकांना थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून मंदिर परिसरात भक्तांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आले होते. मंदिर परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने आणि गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. आता विनापास दर्शन पुन्हा सुरू झाल्याने राज्यासह देशातील विविध भागांतून येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी या निर्णयाचे स्वागत केले असून मंदिरात भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.
मंदिर परिसरात सध्या विविध विकासकामे सुरू असल्याने प्रशासनासमोर दर्शन व्यवस्थापन आणि सुरक्षा राखण्याचे मोठे आव्हान कायम आहे. समामंडप उभारणीसाठी लावण्यात आलेली संरचना, बांधकाम साहित्य आणि उपलब्ध मर्यादित जागा यामुळे गर्दीचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करण्यात येत आहे. विनापास दर्शनाची माहिती मिळताच मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दाखल होत असून स्थानिक ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासन यांच्या समन्वयातून व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक नियंत्रण, रांगांचे नियोजन, स्वच्छता आणि मंदिर परिसरातील शिस्त राखण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. आगामी शनिवार, रविवार तसेच धार्मिक उत्सवांच्या काळात भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने अतिरिक्त उपाययोजनांची तयारीही सुरू करण्यात आली आहे. भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घ्यावे आणि व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षित, सुलभ आणि शांततापूर्ण दर्शनासाठी सर्व संबंधित यंत्रणा सज्ज असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.







