मुंबई : नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोवंडी येथील एका बालरुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. गोवंडी पूर्वेकडील शिवाजीनगर परिसरातील मुस्कान एनआयसीयू अँड चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये विनापरवाना औषधांची विक्री होत असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने तपासणी मोहीम राबवून मोठा औषधसाठा जप्त केला. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत रुग्णालयातील दोन स्वतंत्र खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथिक औषधे साठवून ठेवण्यात आल्याचे आढळले. तपासादरम्यान या औषधांच्या विक्रीसाठी आवश्यक परवाना उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे रुग्णांना औषधे देण्याचे आणि विक्रीची प्रक्रिया हाताळण्याचे काम पात्र औषधनिर्मात्याऐवजी बारावी उत्तीर्ण रिसेप्शनिस्टकडून केले जात असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे बालरुग्णांच्या आरोग्याशी गंभीर स्वरूपाची तडजोड होत असल्याचा आरोप प्रशासनाकडून करण्यात आला आहे. रुग्णालयाचे संचालक डॉ. निलेश शाह यांच्या देखरेखीखाली ही व्यवस्था सुरू असल्याचे तपासात समोर आले. नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी आणि औषधांची सुरक्षित, कायदेशीर तसेच नियमनबद्ध विक्री सुनिश्चित करण्यासाठी राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू असून त्याचाच भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.
तपासणीदरम्यान औषध विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या देयक पुस्तिकाही जप्त करण्यात आल्या. या देयकांमध्ये केवळ रुग्णाचे नाव, दिनांक, औषधाचे नाव आणि आकारलेली रक्कम नमूद करण्यात आली होती. मात्र औषधांचा तुकडी क्रमांक, उत्पादन दिनांक, मुदत समाप्ती दिनांक, उत्पादकाची माहिती तसेच इतर आवश्यक वैधानिक तपशीलांचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. ही बाब ग्राहक संरक्षण आणि औषध विक्रीसंदर्भातील कायदेशीर नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. कारवाईदरम्यान रुग्णालयात विक्रीसाठी ठेवलेला सुमारे नऊ लाख रुपयांहून अधिक किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला. पुढील तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर औषधे व प्रसाधने अधिनियम आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना औषधे खरेदी करताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले असून केवळ परवानाधारक औषध विक्रेत्याकडूनच औषधे खरेदी करावीत, तसेच प्रत्येक व्यवहारासाठी वैधानिक तपशील असलेले देयक घ्यावे, असे सांगितले आहे. रुग्णांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.







