पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्य नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीने इयत्ता चौथीच्या इतिहास विषयात शिवचरित्राला विशेष स्थान दिले आहे. यंदा बालभारतीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या नव्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आली असून चौथीच्या ‘आपल्या सभोवतालचे जग – भाग २’ या पुस्तकात विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा इतिहास आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची सविस्तर ओळख करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, धैर्य, प्रामाणिकपणा, राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमान यांसारख्या मूल्यांचा विकास व्हावा हा या अभ्यासक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतिहासातील महत्त्वाच्या घटना, व्यक्तिमत्त्वे आणि स्वराज्य निर्मितीचा प्रवास सोप्या भाषेत आणि प्रेरणादायी पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.
पुस्तकाची सुरुवात ‘शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र’ या प्रकरणाने होत असून त्या काळातील निजामशाही, आदिलशाही आणि मोगल सत्तेचा प्रभाव तसेच सामान्य जनतेची परिस्थिती यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. स्वराज्याची गरज का निर्माण झाली, हेही या पाठातून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आणि समर्थ रामदास यांच्या कार्याची ओळख करून देणारा ‘संतांचे कार्य’ हा धडा समाविष्ट करण्यात आला आहे. भोसले घराण्याचे कर्तृत्व, शहाजीराजे यांचे योगदान, जिजाबाई आणि दादोजी कोंडदेव यांनी शिवरायांवर केलेले संस्कार, स्वराज्य स्थापनेची सुरुवात आणि प्रारंभीच्या मोहिमा यांचाही अभ्यास विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तसेच प्रतापगडावरील पराक्रम, अफजलखान वध, पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी गाजवलेले शौर्य, शाहिस्तेखानावरील धाडसी कारवाई, पुरंदरचा तह, आग्रा येथून सुटका, राज्याभिषेक सोहळा आणि दक्षिण दिग्विजय यांसारख्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचाही समावेश करण्यात आला आहे. गडकोटांचे व्यवस्थापन, आरमार उभारणी, संरक्षण व्यवस्था आणि लोककल्याणकारी स्वराज्याची शासनपद्धती यांद्वारे विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे धडेही दिले जाणार आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना एकाच पुस्तकातून होणार आहे. दरम्यान, इतिहास हा सतत संशोधनातून समृद्ध होत जाणारा विषय असल्याने शिवचरित्रासंदर्भात उपलब्ध होणारी नवी माहितीही अभ्यासक्रमात समाविष्ट केली जावी, अशी अपेक्षा काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक माहितीच नव्हे, तर संशोधनाधारित नव्या ऐतिहासिक संदर्भांचीही ओळख व्हावी, त्यामुळे त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडेल, असे मत पुस्तक परीक्षणासाठी सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी नोंदवले आहे.







