रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या रायगड किल्ल्यावरील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि दिलासादायक घडामोड घडली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सुमारे ५४ सुरक्षा कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत. ६ जून रोजी पार पडलेल्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आल्याने शिवभक्तांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मागील काही महिन्यांपासून रायगडावरील सुरक्षा कॅमेरे बंद असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. गडावरील काही वादग्रस्त घटनांनंतर सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीतच सुरक्षा यंत्रणा बंद असल्याची बाब अनेक शिवभक्तांच्या मनाला खटकत होती. एप्रिल २०२६ मध्ये यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर समाजमाध्यमांवर तसेच विविध स्तरांवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. आगामी शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी बंद पडलेले कॅमेरे पुन्हा सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक दुरुस्ती आणि तांत्रिक कामे पूर्ण करून गडावरील सर्व ५४ सुरक्षा कॅमेरे ६ जूनपासून पुन्हा सुरू केले आहेत.
राजसदर, होळीचा माळ, तिकीटघर तसेच गडावरील इतर महत्त्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे कार्यरत करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, गर्दीचे प्रभावी नियोजन करणे तसेच कोणत्याही अनुचित प्रकारांवर तातडीने नियंत्रण ठेवणे प्रशासनाला अधिक सुलभ होणार आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, जगदीश्वर मंदिर आणि अन्य दोन ठिकाणी पुरातत्त्व विभागामार्फत बसविण्यात आलेले चार सुरक्षा कॅमेरे अद्याप बंद असल्याची माहिती समोर आली आहे. हे कॅमेरे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर तेही कार्यान्वित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येत्या २६ आणि २७ जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर साजरा होणार असून या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त गडावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रायगड हा केवळ ऐतिहासिक किल्ला नसून तो महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वराज्याच्या वैभवाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींचे जिवंत प्रतीक मानला जातो. त्यामुळे गडावरील सुरक्षा व्यवस्था सक्षम आणि प्रभावी असणे ही प्रत्येक शिवभक्ताची अपेक्षा असते. अनेक महिन्यांनंतर सुरक्षा कॅमेरे पुन्हा सुरू झाल्याने गडाच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेली चिंता काही प्रमाणात दूर झाली असून आगामी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनालाही मोठा दिलासा मिळाला आहे.







