नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई करत पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी आणि गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली असून ते पाकिस्तानस्थित शाहजाद भट्टी आणि त्याचा साथीदार अजमल गुज्जर यांच्या सूचनांनुसार काम करत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, पंजाब सीमेवरून ड्रोनच्या माध्यमातून अवैध शस्त्रास्त्रे, काडतुसे आणि अमली पदार्थ भारतात आणले जात होते. त्यानंतर हे साहित्य दिल्ली-एनसीआर परिसरात विविध माध्यमांतून पुरवले जात होते. पोलिसांनी छापेमारीदरम्यान पाच पिस्तुले, ४१ जिवंत काडतुसे, सात मोबाईल फोन आणि एक स्कॉर्पिओ एसयूव्ही जप्त केली आहे. या नेटवर्कचा विस्तार केवळ तस्करीपुरता मर्यादित नसून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे कामही सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. पैशांचे आमिष दाखवून युवकांना या टोळीत सहभागी करून घेतले जात होते. तसेच दिल्ली, गाझियाबाद आणि आसपासच्या महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी करून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाकिस्तानमधील हँडलर्सना पाठवले जात असल्याची धक्कादायक बाबही उघड झाली आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे संभाव्य मोठा कट उधळण्यात यश मिळाल्याचे सांगितले जात आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनस उर्फ अनस त्यागी (वय २६), मोहित उर्फ योगी (वय २६), दीपक उर्फ दीपक अग्रोला (वय ३८), आरिफ उर्फ प्रधान (वय ३०), करणवीर सिंग (वय २६), जतन (वय २९) आणि साबिर (वय ३०) यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अनस त्यागीवर यापूर्वी तीन गुन्हे दाखल असून नोव्हेंबर २०२५ पासून त्याचा पाकिस्तानस्थित अजमल गुज्जर आणि शाहजाद भट्टी यांच्याशी शेकडो वेळा संपर्क झाला होता. मोहित उर्फ योगी हा गाझियाबादचा रहिवासी असून तोही नोव्हेंबर २०२५ पासून अजमल गुज्जरच्या संपर्कात होता. दीपक अग्रोला याच्यावर खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि गँगस्टर कायद्यासह तब्बल २३ गुन्हे दाखल आहेत. मार्च २०२६ पासून त्याचा पाकिस्तानस्थित हँडलर्सशी शंभरहून अधिक वेळा संपर्क झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरिफ उर्फ प्रधान याच्यावर शस्त्र कायदा आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असून तो थेट अजमल गुज्जरच्या संपर्कात होता. करणवीर सिंगवरही एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून तोही या नेटवर्कचा भाग असल्याचे समोर आले आहे. जतन आणि साबिर या दोघांनाही या टोळीशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, देशविरोधी कारवायांशी संबंधित आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.







