मुंबई : नागरिकांच्या तक्रारींचे जलद, प्रभावी आणि पारदर्शक निवारण करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने यंदा ‘माय बीएमसी मार्ग’ ही एकात्मिक तक्रार व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. या नव्या प्रणालीद्वारे नागरिकांना महानगरपालिकेच्या विविध विभागांशी संबंधित तब्बल ११४ प्रकारच्या तक्रारी एकाच ॲप्लिकेशनवरून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे, रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी यापूर्वी वापरण्यात येणारे ‘पॉटहोल क्विकफीक्स’ हे स्वतंत्र मोबाईल ॲप आता ‘माय बीएमसी मार्ग’ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या तक्रारींसाठी स्वतंत्र ॲप किंवा प्रणालीचा वापर करण्याची गरज राहणार नाही. पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण होतात. त्यामुळे वाहनचालक, पादचारी आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून महानगरपालिका दरवर्षी खड्डे बुजविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करते. यासोबतच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करून खड्डे बुजविण्याचे कामही करण्यात येते. तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर वाढविण्यावर महानगरपालिकेने भर दिला आहे. याच उद्देशातून गेल्या वर्षी ‘पॉटहोल क्विकफीक्स’ हे ॲप सुरू करण्यात आले होते. या ॲपद्वारे नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांची छायाचित्रे, अचूक स्थान आणि इतर तपशीलांसह तक्रारी नोंदविणे शक्य झाले होते. या उपक्रमाला मुंबईकरांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता.
दरम्यान, विविध विभागांशी संबंधित तक्रारींसाठी नागरिकांना स्वतंत्र प्रणालींचा वापर करावा लागत असल्याने तक्रार नोंदणी प्रक्रियेत अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेने ‘माय बीएमसी मार्ग’ ही सर्वसमावेशक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीवर रस्त्यांवरील खड्ड्यांव्यतिरिक्त घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी समस्या, पाणीपुरवठा, रस्ते देखभाल, उद्याने, सार्वजनिक आरोग्य, कीटक नियंत्रण, अतिक्रमण, प्रकाशयोजना आदी विविध विभागांशी संबंधित एकूण ११४ प्रकारच्या तक्रारी नोंदविता येणार आहेत. या प्रणालीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना तक्रार नोंदविण्यासोबतच संबंधित छायाचित्रे अपलोड करणे, तक्रारीची सद्यस्थिती तपासणे, संबंधित विभागाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा मागोवा घेणे आणि तक्रार निकाली निघाल्यानंतर त्याची माहिती मिळविणे शक्य होणार आहे. त्यामुळे तक्रार नोंदणीपासून अंतिम निवारणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक, परिणामकारक आणि नागरिककेंद्रित बनली आहे. महानगरपालिका प्रशासनाने मुंबईकरांना आवाहन केले आहे की, रस्त्यांवरील खड्ड्यांसह सर्व नागरी समस्यांबाबतच्या तक्रारी ‘माय बीएमसी मार्ग’ प्रणालीवरच नोंदवाव्यात. अँड्रॉइड वापरकर्त्यांना हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून, तर आयफोन वापरकर्त्यांना ॲप स्टोअरवरून डाउनलोड करता येणार असून, नागरिकांना महानगरपालिकेच्या सेवांचा लाभ अधिक सुलभपणे घेता येणार आहे.







