मुंबई : दक्षिण मुंबईतील मलबार हिल उन्नत निसर्ग मार्ग येथे शुक्रवारी सकाळी मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. मलबार हिल परिसरातील फिरोजशाह मेहता गार्डन आणि कमला नेहरू पार्क यांना जोडणाऱ्या या लोकप्रिय निसर्ग उन्नत मार्गावरील मुख्य वॉकवेवर झाड पडल्यामुळे मार्गाच्या संरचनेचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाल्याची नोंद नाही. घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने निसर्ग उन्नत मार्ग पर्यटक आणि नागरिकांसाठी तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा मार्ग शहरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांपैकी एक मानला जात असल्याने अनेक पर्यटक आणि नागरिक नियमितपणे येथे भेट देत असतात.
घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या उद्यान विभाग आणि जल अभियंता विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने कोसळलेले झाड हटविण्याचे आणि मार्ग मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. झाड पडल्यामुळे वॉकवेच्या सुरक्षिततेवर काही परिणाम झाला आहे का, याची तांत्रिक तपासणीही करण्यात येत आहे. याशिवाय संपूर्ण मार्गाचे सुरक्षितता परीक्षण आणि आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत नागरिकांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महानगरपालिकेने नागरिक आणि पर्यटकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत या मार्गावर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.







