वृत्तसंस्था : अमेरिका आणि इराण यांच्यातील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांदरम्यान ऐतिहासिक शांतता करार अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला आहे. येत्या काही दिवसांत, कदाचित याच आठवड्याच्या अखेरीस, करारावर स्वाक्षऱ्या होऊ शकतात, असे ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या घडामोडीमुळे जागतिक स्तरावर आशावादाचे वातावरण निर्माण झाले असून ऊर्जा बाजारपेठांनाही दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील दीर्घकालीन मतभेद मिटविण्यासाठी कराराचा मसुदा तयार करण्यात येत असून दोन्ही बाजूंचे अधिकारी त्यावर काम करत आहेत. तसेच इराणवर नियोजित काही लष्करी कारवाया स्थगित करून राजनैतिक मार्गाला प्राधान्य देण्यात आल्याचेही त्यांनी सूचित केले आहे.
या प्रस्तावित करारात होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत करण्यासह आण्विक कार्यक्रमासंदर्भातील काही मुद्द्यांवर पुढील चर्चा करण्याचा आराखडा असू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. मात्र इराणने अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले असून कराराबाबतची चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. इराणच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांतील काही दावे अद्याप तर्काधारित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी व्यक्त केलेला आशावाद आणि प्रत्यक्ष करार यामध्ये अजून काही अंतर असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या संभाव्य करारामुळे जागतिक तेलपुरवठा आणि कच्च्या तेलाच्या किमतींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तथापि, कराराच्या अंतिम अटी आणि दोन्ही देशांची अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या विश्लेषकांचे मत आहे.







