मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. पक्षाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अनेक घडामोडी घडल्याचे नमूद करत त्यांनी यापुढे पक्षाच्या कामकाजात कुणाचाही हस्तक्षेप सहन केला जाणार नसल्याचे ठामपणे सांगितले. पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट करत, कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका, असेही त्यांनी म्हटले. अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा पक्षाचा पहिलाच वर्धापन दिन असल्याने सुनेत्रा पवार यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाषणासाठी त्या उभ्या राहताच ‘वहिनीसाहेब’ आणि ‘अजित पवार अमर रहे’च्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकदा त्यांचा कंठ दाटून आला आणि काही क्षण त्या भावूक झाल्या.
पक्षाची जबाबदारी आणि कर्तव्याची पूर्ण जाणीव असल्याचे सांगताना सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा सन्मान केला जाईल आणि पात्र कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले. अजित पवार यांनी अनेकांना संधी दिली, त्यांचे हट्ट पुरवले आणि समजून घेतले, मात्र आता पक्षहिताला सर्वोच्च स्थान दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ नेते आणि महिलांचा सन्मान कायम राखला जाईल, पण संघटनात्मक कामकाजात हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा संदेश त्यांनी दिला. विशेष म्हणजे, हस्तक्षेपाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी लिखित भाषण बाजूला ठेवून थेट भूमिका मांडली. पक्षातील अलीकडच्या अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. पक्षात स्थान हे कामगिरीवर ठरेल, केवळ ज्येष्ठतेवर नाही, असे सांगत त्यांनी आगामी महामंडळ नियुक्त्यांमध्ये निष्ठावंतांना संधी दिली जाईल, असे जाहीर केले. तसेच अल्पसंख्याक, दलित आणि आदिवासी समाजाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जातीय व धार्मिक द्वेषाला पक्षात स्थान नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.







