मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायक, वेगवान आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान ई-बस सेवा’ योजनेअंतर्गत मुंबईत लवकरच १,५०० नवीन मिडी इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस दाखल होणार आहेत. या सर्व बसेस १२ वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार असून, त्यासाठी कंपन्यांची निवड प्रक्रिया आणि निविदा अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. बेस्ट प्रशासनाच्या माहितीनुसार, या बसेस टप्प्याटप्प्याने मुंबईच्या रस्त्यांवर उतरवल्या जातील. यंदाच्या वर्षअखेरीस पहिल्या टप्प्यातील बसेस ताफ्यात दाखल होण्याची अपेक्षा आहे, तर पुढील एक ते दोन वर्षांत सर्व १,५०० बसेस सेवेत दाखल होतील. सध्या बेस्टच्या ताफ्यात २,७९२ बसेस असून नव्या बसेसच्या समावेशामुळे प्रवासी सेवा अधिक मजबूत होणार आहे. या उपक्रमामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे, प्रदूषण कमी करणे आणि मेट्रो तसेच रेल्वे स्थानकांपर्यंतची शेवटच्या टप्प्यातील प्रवास सुविधा अधिक प्रभावी करणे हे उद्दिष्ट आहे.
या नवीन बसेस ९ मीटर लांबीच्या मिडी प्रकारातील असल्याने मुंबईतील अरुंद रस्ते, गल्ल्या आणि गर्दीच्या भागांत सहजपणे धावू शकतील. रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके, व्यावसायिक केंद्रे आणि निवासी भाग यांना जोडणाऱ्या फीडर मार्गांवर या बसेस प्रामुख्याने चालविण्यात येणार आहेत. ज्या मार्गांवर मोठ्या बसेस चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही किंवा प्रवासी संख्या तुलनेने कमी असते, तेथे या मिडी बसेस उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे बेस्टचा परिचालन खर्च कमी होण्यास मदत होईल. दरम्यान, सध्याचे बसभाडे कायम ठेवण्यात आले असून ० ते ५ किलोमीटर अंतरासाठी साध्या बसचे किमान भाडे १० रुपये आणि वातानुकूलित बसचे १२ रुपये आहे. नियमित प्रवाशांसाठी ‘चलो’ ॲप आणि स्मार्ट कार्डच्या माध्यमातून मासिक अमर्यादित प्रवास पास तसेच विविध सवलतीच्या योजना उपलब्ध राहतील. नव्या बसेसचे मार्ग, वेळापत्रक आणि सेवा तपशील बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होताच ‘चलो’ ॲपवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बेस्ट प्रशासनाने ठरवलेले सध्याचे सुधारित तिकीट दर खालीलप्रमाणे आहेत:
- ० ते ५ किमी (किमान भाडे): साधी बस ₹१० | एसी बस ₹१२
- ५ ते १० किमी: साधी बस ₹२० | एसी बस ₹२४
- १० ते १५ किमी: साधी बस ₹३० | एसी बस ₹३६
- १५ ते २० किमी: साधी बस ₹३५ | एसी बस ₹४२







