पुणे : शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या आदेशानुसार, शहरातील सर्व खाऊ गल्ल्या, फेरीवाले, पान टपऱ्या, अंडा भुर्जी, चायनीज आणि इतर फिरत्या स्वरूपातील अस्थायी आस्थापना रात्री १० वाजताच बंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी होणारी गर्दी, अनुचित प्रकार आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, स्थायी स्वरूपातील हॉटेल, उपहारगृहे आणि इतर कायमस्वरूपी आस्थापनांना या वेळेची मर्यादा लागू नसणार आहे. आदेशाची अंमलबजावणी करताना कोणत्याही आस्थापनात विनाकारण प्रवेश करू नये तसेच अयोग्य भाषेचा वापर टाळावा, अशा सूचनाही पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पुण्याच्या खाद्यसंस्कृतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः विद्यार्थी, रात्रपाळीतील कर्मचारी आणि कमी खर्चात जेवणाचा पर्याय शोधणाऱ्या नागरिकांसाठी हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ महत्त्वाचा आधार ठरतात. रात्री १० नंतर अनेक भागांत अशा ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसते. दुसरीकडे, या निर्णयामुळे छोट्या व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढती महागाई, भाडे आणि व्यवसाय खर्च यामुळे अनेकजण हातगाड्या किंवा लहान आस्थापनांच्या माध्यमातून उदरनिर्वाह करत आहेत. अशा परिस्थितीत रात्रीच्या व्यवसायावर निर्बंध आल्यास उत्पन्नावर मोठा परिणाम होईल, अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत नागरिक आणि व्यावसायिकांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटत असून पुढील काळात यावर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







