मालवण : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवरील सुरक्षेला प्राधान्य देत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डने मालवण बंदर क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २६ मे २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि वॉटर स्पोर्ट्स पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर तात्पुरता परिणाम होणार असला, तरी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ही उपाययोजना आवश्यक मानली जात आहे. प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन एस. टी. उगालमुगले यांनी १३ मे रोजी जारी केलेल्या पत्रानुसार सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाणारी प्रवासी वाहतूक, बोटिंग, स्कूबा डायव्हिंग तसेच विविध जलक्रीडा उपक्रम बंद राहणार आहेत. ‘इनलँड व्हेसल्स ॲक्ट, १९१७’ अंतर्गत नोंदणीकृत सर्व बोटी आणि जहाजांना मान्सून काळात व्यावसायिक उपक्रम थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
मालवण बंदर विभागाने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली असून, एकूण ३१ संस्था, पर्यटन सोसायट्या आणि वैयक्तिक बोट चालकांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यात सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वहातुक वेलफेअर असोसिएशन, शिवशक्ती जलपर्यटन संस्था, तारकर्ली, देवबाग आणि दांडी येथील बोटिंग संघटना तसेच स्थानिक स्कूबा डायव्हिंग व्यावसायिकांचा समावेश आहे. दरवर्षी पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने उंच लाटा, जोरदार वारे आणि अनिश्चित हवामानामुळे जलपर्यटन धोकादायक ठरते. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून ही खबरदारी घेतली जाते. मागील वर्षीही २० मेपासून पर्यटन हंगाम बंद करण्यात आला होता. यंदा २६ मेपासून अधिकृत बंदी लागू होत असून, प्रशासनाने सर्व संबंधितांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.







