नवी मुंबई : पनवेल शहराच्या पर्यटन विकासात लवकरच एक महत्त्वपूर्ण भर पडणार असून, समुद्रकिनाऱ्यालगत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पनवेल आणि परिसराला पर्यटनाच्या नकाशावर नवे स्थान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकारला जाणार असून, संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रकल्पाला गती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. मंत्रालयात नुकत्याच पार पडलेल्या विशेष बैठकीत या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्य सरकारच्या मते, हा प्रकल्प केवळ स्थानिक नागरिकांसाठीच नव्हे तर देश-विदेशातील पर्यटकांसाठीही मोठे आकर्षण ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सागरी जीवसृष्टीचे दर्शन आणि मनोरंजन यांचा संगम या प्रकल्पामध्ये अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे पनवेल शहराला पर्यटन, शिक्षण आणि रोजगाराच्या दृष्टीने मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
पनवेलमधील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीतील मत्स्य उपकेंद्राच्या जागेवर हा संपूर्ण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सुमारे १० एकर क्षेत्रावर विकसित होणाऱ्या या प्रकल्पात भव्य अॅक्वेरियमसह सी लायन केंद्राची उभारणी केली जाणार आहे. सागरी जैवविविधता, दुर्मिळ मासे, आधुनिक मत्स्यविज्ञान आणि समुद्री परिसंस्थेबाबत माहिती देणारे हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठीही अभ्यासाचे महत्त्वपूर्ण ठिकाण ठरणार आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, पर्यावरण अभ्यासक आणि पर्यटकांना सागरी जीवनाची जवळून ओळख करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन आणि सर्वतोपरी सहकार्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे पनवेल परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळण्यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.







