मुंबई : देशभरात एपीके फाइलच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या मोठ्या टोळीचा सायबर पोलिसांनी (पश्चिम विभाग) पर्दाफाश करत त्यांच्या सर्व्हरला पूर्णतः बंद केले आहे. या कारवाईमुळे फसवणुकीचे विस्तृत जाळे उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले. आरिफ अन्सारी (२८), मेहबूब आलम (२६) आणि बिलाल शेख (२८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, विशेष म्हणजे हे तिघेही अल्पशिक्षित असूनही त्यांनी अत्याधुनिक पद्धतीने २५० हून अधिक प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार राबवले होते. २०२४ मध्ये झारखंडमधील जामतारा येथे याच प्रकरणात त्यांना अटक झाली होती, मात्र सप्टेंबरमध्ये जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा आपले जाळे सक्रिय केले. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास, सीडीआर विश्लेषण आणि झारखंड कनेक्शनच्या आधारे या टोळीचा माग काढला. अखेर आरोपी गंगटोकहून परतत असताना शताब्दी एक्सप्रेसमध्ये फिल्मी पद्धतीने अटक करण्यात आली. या कारवाईत डॉ. नितीन गच्छे, विजयकुमार घोरपडे, धनवेश पाटील, राजेश खुशलानी तसेच सचिन सावंत, संग्राम जाधव आणि विकास दिघे या पथकाचा समावेश होता.
तपासात समोर आले की, आरोपी विविध सरकारी व खाजगी संस्थांच्या नावाने बनावट एपीके फाइल तयार करून त्यांची विक्री करत होते. यामध्ये आरटीओ ई-चालान, बँका, महावितरण, पीएम किसान योजना, पीएनबी, टाटा पॉवर आदींचा समावेश होता. या फाइल्सच्या माध्यमातून देशभरातील सायबर गुन्हेगार फसवणूक करत होते आणि पैसे ‘म्यूल अकाउंट’द्वारे जमा केले जात होते. आरोपींच्या बँक खात्यांमध्ये आतापर्यंत ४० ते ५० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे आढळले आहे. त्यांनी स्वतःचे सर्व्हर उभारून एपीके फाइल खरेदीदारांचे नेटवर्क देशभर चालवले होते. हे सर्व्हर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ते बंद करण्यात आले, ज्यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. मुंबईत नोंद असलेल्या ३०० हून अधिक प्रकरणांपैकी २०० हून अधिक गुन्ह्यांमध्ये या टोळीचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर राज्यभर हा आकडा हजारोंमध्ये असण्याची शक्यता आहे. २०२१ पासून ही टोळी सक्रिय होती आणि डार्कवेबच्या माध्यमातून त्यांनी एपीके तयार करण्याची साधने मिळवली होती. सुरुवातीला ५ ते ७ हजारांत विक्री करणाऱ्या या फाइल्सची किंमत नंतर १० ते १५ हजारांपर्यंत, तर काही प्रकरणांत ३० ते ४० हजारांपर्यंत पोहोचली होती.







