मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्स्प्रेससवे वरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून हा मार्ग १ मे २०२६ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि पोलीस प्रशासनाने टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) Pravin Salunkhe यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. पहिल्या टप्प्यात १ मे ते ३१ मेदरम्यान केवळ हलकी मोटार वाहने (LMV), बस आणि प्रवासी वाहनांनाच परवानगी देण्यात आली असून मालवाहू वाहनांना पूर्णपणे बंदी असेल. दुसऱ्या टप्प्यात १ जूनपासून हलकी वाहने आणि बस सुरू राहतील, तर अवजड वाहनांबाबत निर्णय पुढील सहा महिन्यांच्या निरीक्षणानंतर घेतला जाईल.
सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने काही कडक नियम लागू केले आहेत. ‘हॅझमॅट’ (धोकादायक वस्तू वाहतूक करणारी) वाहने या प्रकल्पातील बोगद्यांतून जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून त्यांनी जुन्या मार्गाचाच वापर करावा लागेल. वेगमर्यादा हलक्या वाहनांसाठी ताशी १०० किमी आणि बससाठी ८० किमी निश्चित करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असून ५ टक्क्यांपर्यंतची सवलत लागू राहील. या नव्या मार्गामुळे घाटातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. १ मेपासून लागू होणाऱ्या या निर्णयाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.







