ठाणे : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयानंतर ठाण्यात एक वेगळाच उपक्रम सुरू झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने परप्रांतीय रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांसाठी मराठी शिकविण्याचे विशेष वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. “ज्या राज्यात आपण राहतो, त्या राज्याची भाषा येणे आवश्यक आहे,” या भूमिकेतून हा उपक्रम राबवण्यात येत असून, याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भाजपचे ठाणे शहर चिटणीस ॲड. दिनानाथ पांडे यांनी दिली. मराठी न येणाऱ्या चालकांना नव्या नियमांमुळे अडचणी निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने हे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
१ मेपासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य होणार असल्याने अनेक परप्रांतीय चालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने पुढाकार घेत सात दिवसांत मराठी शिकविण्याचा अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. सध्या ठाण्यातील कोपरी, कळवा आणि वर्तकनगर परिसरात हे वर्ग सुरू असून, आतापर्यंत सुमारे १०० जणांनी सहभाग नोंदवला आहे. शहरातील विविध भागांत या उपक्रमाचे बॅनर झळकत असून, स्थानिकांचेही लक्ष वेधले जात आहे. पुढील काळात ठाणे शहरातील इतर भागांमध्येही असे वर्ग सुरू करण्याचा मानस असून, या उपक्रमामुळे भाषा अडथळा न ठरता रोजगार टिकविण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.







