नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीत भारताला पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी इराणकडून जवळपास १०० जहाजे होर्मुज सामुद्रधुनीतून भारताकडे रवाना झाली आहेत. पुढील ९ ते १० दिवसांत हा इंधन पुरवठा देशात पोहोचण्याची शक्यता आहे. ज्यामुळे देशातील इंधनाचा तुटवडा दूर होईल, अशी माहिती पेट्रोल असोसिएशनच्या कोअर कमिटीचे सदस्य अली दारुवाला यांनी दिली.
अली दारुवाला यांनी सांगितले की, इराणचे परराष्ट्र मंत्री आणि भारताचे परराष्ट्र मंत्री यांच्यात बैठक झाली. त्यानंतर इराणने भारतासह जगातील पाच देशांना इंधन वाहतुकीसाठी परवानगी दिली. भारताकडे निघालेले सर्व टँकर पुढील ८ ते ९ दिवसांत सुरक्षितपणे पोहोचणार आहेत. भारताला पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी आणि एलएनजीचा पुरवठा करण्यासाठी जवळपास १०० जहाजे भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. अली दारुवाला असेही म्हणाले की, सध्याची देशातील ही परिस्थिती इंधन तुटवड्यामुळे नसून तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे निर्माण झाली आहे.






