नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाच्या स्थितीची झळ सध्या भारतालाही बसत आहे. भारताला कच्चे तेल तसेच सीएनजी, एलएनजी या नैसर्गिक वायूचा पुरवठा हा आखाती देशांतूनच होतो. इराणने होर्मुझची सामुद्रधुनीच बंद केल्यामुळे संपूर्ण जलवाहतूक ठप्प आहे.परिणामी भारतात इंधन दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतात सध्यातरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेली नसली तरीही युद्धाची स्थिती अशीच राहिली तर भविष्यात मात्र इंधनाचे दर वाढतील अशी शंका व्यक्त केली जात आहे. सध्यातरी भारतात घरगुती गॅस सिलिंडरचा तसेच व्यावसायिक सिलिंडरचा भाव वाढवण्यात आला आहे. परिणामी सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. असे असतानाच आता या भाववाढीनंतर सामान्यांना काहीसा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.
सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा भाव लगेच वाढणार नाही. सध्या गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे १४.२ किलोचे गॅस सिलिंडर ९१३ रुपयांना मिळत आहे. हेच गॅस सिलिंडर अगोदर ८५३ रुपयांना मिळायचे. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. परंतु याआधी झालेल्या नफ्यामुळे तेल कंपन्या सध्याच्या आणीबाणीच्या स्थितीला सहन करू शकत आहेत. त्यामुळे लगेच पेट्रोल आणि डिझेलचाही भाव वाढण्याची शक्यता नाही. तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सध्याच वाढ होणार नाही, असेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थींना मिळत असलेली ३०० रुपयांची सबसीडीदेखील चालूच राहणार आहे. त्यामुळे सध्या गॅस सिलिंडरचा भाव वाढला असली तरीही या योजनेच्या १०.३३ कोटी लाभार्थी कुटुंबांना ३०० रुपयांच्या अनुदानाचा फायदा मिळत राहणार आहे.







