मुंबई : नैसर्गिकरीत्या विघटन न होणाऱ्या प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर राज्यात पूर्वीपासूनच बंदी आहे. ही बंदी अधिक स्पष्ट, परिणामकारक आणि कठोर करण्यासाठी लवकरच स्वतंत्र शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल. तसेच, या निर्णयामध्ये केवळ प्लास्टिक फुलांचे उत्पादन व विक्रीच नव्हे, तर सजावटीसाठी त्यांचा वापर करणारे डेकोरेटर देखील शिक्षेस पात्र असतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.
मोठे हॉल जे अशा डेकोरेशनला परवानगी देतील, त्यांच्यावरही कारवाईची तरतूद या जीआरमध्ये असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आ.जयंत पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेने दादर फुल मार्केटमधील फुल विक्रेत्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली तिथून हटवले आहे. त्यामुळे मुंबई फुल विक्रेता असोशिएशने बंद पुकारला असून सध्या फुलविक्री पूर्णपणे बंद असल्याचे सांगत हा बंद मागे घेण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिक्रमण कारवाईमुळे फूल विक्रेत्यांवर कारवाई झाली असेल, तर त्यांनाही योग्य ती जागा देऊ. महापालिकेला तातडीने आदेश देण्यात येतील असे सांगितले.







