मुंबई : ‘राष्ट्र प्रथम’ अभियानांतर्गत राज्यातील २१ हजार २७९ शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या मुलींना १० हजार माजी सैनिकांमार्फत सैनिकी शिक्षणही देण्यात येणार असून १० हजार प्रबोधनकारांमार्फत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचार आणि व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
राज्यातील २१ हजार २७९ शाळांमध्ये १५ जानेवारी २०२६ पासून मुलींना स्व:संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. १५ जानेवारी ते २० मार्च २०२६ या कालावधीत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात एकूण ६७ सत्रे नियोजित आहेत. शिक्षण मंत्र्यांच्या सूचनेनुसार, प्रशिक्षणात केवळ ‘शारीरिक’ नाही, तर ‘मानसिक’ स्वास्थ्यावरही भर दिला आहे. प्रशिक्षणाचा आराखडा सर्वसमावेशक असून, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच यासाठी अशासकीय संस्थांचेही सहकार्य घेतले जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांना १० हजार माजी सैनिक, एनसीसी आणि स्काऊट गाईड कॅडेट्सच्या माध्यमातून लष्करी शिस्त, संचलन आणि देशरक्षणाचे धडे देण्यात येणार आहे. तसेच १० हजार प्रबोधनकारांमार्फत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचार आणि व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.







