मुंबई : महाराष्ट्र टपाल मंडळाने बुधवारी मुंबई जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) येथे आयोजित केलेल्या बहुआयामी कार्यक्रमात टपाल कर्मचारी आणि टपाल सेविकांसाठी २०० विद्युत बाइकचे अधिकृत अनावरण केले. याच समारंभात १९७१ च्या ऐतिहासिक लोंगेवाला युद्धाचा सन्मान करणाऱ्या विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन केले.
जीपीओ येथील त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते जीपीओ येथे टपाल कर्मचारी आणि महिला टपाल कर्मचाऱ्यांना टपाल वितरणासाठी इ-बाइक देण्यात आली. ‘इंडिया पोस्टच्या या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे कार्यक्षम तसेच पर्यावरणास अनुकूल सेवा देणे शक्य होणार आहे. इ-बाइकमुळे पर्यावरण रक्षण होत असून शाश्वत विकास काय असतो, हे जीपीओने दाखवून दिले आहे. याद्वारे नवीन भारताची वाटचाल होते आहे’, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले, तसेच महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. टपाल खात्यात ५० टक्के महिला तर, काही पोस्ट कार्यालयात १०० टक्के महिला आहेत. लोकसेवेत स्त्रियांची संख्या मोठी आहे. टपाल कर्मचारी टपाल पोहचवण्याबरोबरच संस्कृती जोपासत आहेत. देशातील सर्वात जुनी व विश्वासार्ह संस्था म्हणून असलेली टपाल कार्यालयाची प्रतिमा अधिकच बळकट होईल, असेही त्यांनी सांगितले. मुख्य पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह यांनी पारंपरिक पत्र पाठवण्याचे काम कमी झाले आहे. तर, पार्सलचे प्रमाण अनेक पटीने वाढले आहे. त्यामुळे वाढलेल्या पार्सलचा भार कमी करण्यासाठी टपाल कर्मचाऱ्यांना २०० इ-बाइक देण्यात आल्याचे सांगितले. पार्सल वितरणात मोठी वाढ होत असल्याने इ-बाइक सेवेचा मोठा लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.







