वृत्तसंस्था : यापुढे ज्वेलरीच्या दुकानांमध्ये चेहरा झाकून जाणाऱ्या ग्राहकांना प्रवेश नाकरला जाणार आहे. म्हणजेच हिजाब, बुर्खा, चेहऱ्यावर पदर घेतलेल्या महिलांबरोबरच मास्क, हेल्मेट, मुखटवटा घालून येणाऱ्यांनाही यापुढे दागिन्यांच्या दुकानात प्रवेश नसेल. ऑल इंडिया ज्वेलर्स गोल्डस्मिथ फेड्रेशनच्या बिहार विभागाने हा निर्णय घेतला आहे. सुरक्षेचं कारण पुढे देत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं गेलं आहे. मात्र आता यावरुन बिहारमधील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. तर विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रीय जनता दल म्हणजेच आरजेडीने याला विरोध केला आहे.
ऑल इंडिया ज्वेलर्स गोल्डस्मिथ फेड्रेशनचे बिहारचे अध्यक्ष अशोक वर्मा यांनी बिहारमधील सर्व जिल्ह्यांमधील अध्यक्षांची भेट घेतली. याच बैठकीमध्ये कोणतीही व्यक्ती चेहरा झाकून दुकानात प्रवेश करणार असेल तर तिला प्रवेश न देण्याचं ठरलं. या प्रकरणावरुन राजकारण होत असल्याचं समोर आल्यानंतर अशोक वर्मा यांनी नवं पत्रक जारी करुन सर्व ज्वेलर्सला चेहरा झाकून आलेल्या व्यक्तीला दुकानात प्रवेश देऊ नये. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हिजाब, मास्क, मुखवटा, हेल्मेटसारख्या गोष्टी काढूनच त्यांना प्रवेश द्यावा, असं म्हटलं आहे. ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये मोठ्याप्रमाणात चोऱ्या होऊ लागल्या आहेत. त्या रोखण्यासाठीच असोसिएशनने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती पोलिसांनाही देण्यात आलेली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे या नियमांची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. हिजाब, मास्क, मुखवटा, हेल्मेट घातलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही, अशा नोटीसा दुकानांबाहेर लागल्याचं पाहायला मिळत आहे.







