मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांची वाहतुकीअभावी मोठी कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणूक ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मध्यरात्री आणि पहाटे विशेष लोकल रेल्वे, बेस्ट बस आणि मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने केली आहे.
निवडणूक प्रक्रियेत मतदान साहित्याचे वाटप, ते जमा करणे आणि अंतिम अहवाल सादर करताना कर्मचाऱ्यांना मध्यरात्री १ ते २ वाजेपर्यंत काम करावे लागते. तसेच, मतदानाच्या दिवशी प्रक्रिया वेळेत सुरू करण्यासाठी पहाटे ५ वाजताच केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असते. मात्र, या वेळेत मुंबईतील लोकल, बेस्ट आणि मेट्रो सेवा मर्यादित किंवा बंद असतात. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना केंद्रावर पोहोचणे किंवा घरी परतणे कठीण होणार आहे. संघटनेने निवडणूक आयोग, राज्य सरकार, रेल्वे आणि परिवहन विभागाला पत्र लिहून खालील मागण्या केल्या आहेत. १४ आणि १५ जानेवारी रोजी मध्यरात्री उशिरापर्यंत लोकल रेल्वे सेवा सुरू ठेवावी. १५ जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी पहाटे लवकर रेल्वे फेऱ्या सुरू कराव्यात. याच कालावधीत बेस्ट बस आणि मुंबई मेट्रो सेवादेखील अधिक वेळ सुरू ठेवण्यात यावी. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या कार्यात कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने विशेष वाहतूक व्यवस्था जाहीर करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.







