मुंबई : जगभरात आज नवीन वर्ष २०२६ मोठ्या जल्लोषात स्वागत केले जात आहे. मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी, जल्लोष करत सरत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाचे स्वागत करण्यात आले. दुसरीकडे नववर्षाच्या पहिल्या दिवसाची देवदर्शनाने करण्यासाठी नागरिकांनी मंदिरांमध्ये गर्दी केली आहे. त्यामुळे राज्यभरातील मंदिरे भाविकांनी फुलून गेली असून भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.
इंग्रजी नवीन वर्षाच्या स्वागताला पंढरपुरात भक्तांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते. वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी. या हेतूने प्रत्येक वारकरी विठ्ठल भक्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हजेरी लावतोय. त्याचबरोबर प्रभादेवी येथील मुंबईचं आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी गर्दी केली आहे. यंदा ३ ते ४ लाख भाविकांच्या गर्दीची अपेक्षा असून, मंदिर न्यासाकडून भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.







