मिररोड : भाईंदरमधील तलाव रोड परिसरात आज अचानक बिबट्या दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मानवी वस्तीत आलेल्या या बिबट्याने एका कुटुंबावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये बिबट्या निर्धास्तपणे फिरतानाचे फोटो, व्हिडीओ काढले आहेत. बिबट्या एका इमारतीमध्ये शिरल्याचेही या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि वनविभागाला तातडीने कळवण्यात आले असून प्रशासन सतर्क झालं आहे.
परिसरात बिबट्या असल्याने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू असून, बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी वनविभागाचे पथक कार्यरत आहे. मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात ७ जण जखमी झाले असून, एक जण गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी नेण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, बिबट्या एका घरात असून अग्निशमन दलाचे पथक त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.







