ठाणे : अचूकता, संयम, एकाग्रता आणि शिस्त यांचे केंद्रबिंदू असलेल्या नेमबाजी खेळासाठी कल्याण शहरात कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील खेळाडूंसाठी तीन शूटिंग रेंज असणारे ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे केंद्र सुरू होत आहे. डोंबिवली महानगरपालिकेच्यावतीने कल्याण पश्चिमेतील कोकण वसाहत परिसरात आधुनिक आणि सुसज्ज शूटिंग रेंज उभारण्यात आली आहे. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते रविवारी या केंद्राचे उद्घाटन झाले. या शूटिंग रेंजमुळे कल्याण शहरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.
नेमबाजी या खेळाने भारताला ऑलिम्पिकसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदकं मिळवून दिली आहेत. आणि कल्याण डोंबिवलीतीलही अनेक होतकरू खेळाडू या क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहेत. कल्याण, डोंबिवलीमध्ये सरावासाठी या खेळाडूंना शूटिंग रेंज उपलब्ध नसल्याने ठाणे, मुंबई किंवा अंबरनाथ येथील शूटिंग रेंज गाठावी लागत होती. आता आपल्या शहरातच ही सुसज्ज सुविधा उपलब्ध झाल्याने वेळ, खर्च आणि मेहनत वाचल्याने खेळाडू आपले कौशल्य अधिक प्रभावीपणे ते विकसित करू शकतील असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. याठिकाणी असलेल्या प्रशिक्षित मार्गदर्शक, सुरक्षित वातावरण आणि उत्तम दर्जाच्या सोयी-सुविधांमुळे येथून राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुणवंत नेमबाज घडण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने त्यांनी सांगितले. यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या स्थानिक नगरसेवक संजय पाटील यांच्यासह पालिका प्रशासनाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त केले. कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडजवळील कोकण वसाहत याठिकाणी हे शूटिंग रेंज उभारण्यात आले आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने ९५ लाख, आमदार विश्वनाथ भोईर यांनी ५० लाख आणि राज्य शासनाकडून २५ लाख असा १ कोटी ७० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. या केंद्रात पहिल्या सभागृहामध्ये २५ मीटरचे एक तर दुसऱ्या सभागृहात प्रत्येकी १० मीटरचे दोन अशा एकूण ३ शूटिंग रेंजचा समावेश आहे. तसेच २५मीटर रेंजमध्ये ५ टार्गेटस तर १० मीटर रेंजमध्ये १२ टार्गेट्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत.







