मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी इथं राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणं यंदाही इंदू मिल स्मारकाचा मुद्दा चर्चेचा ठरला. इंदू मिल स्मारकाबाबत अनेकांचे आक्षेप असल्याचं नरेंद्र जाधव यांनी सर्वांसमक्ष मुख्यमंत्र्यांना सांगितलं. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील वर्षापर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करायचं सरकारचं लक्ष असल्याचं सांगितलं.
देशाला संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मार्ग दाखवला. त्या मार्गावर चालण्याची पुन्हा एकदा प्रेरणा प्राप्त करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो आहोत. आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये प्रचंड मोठी विषमता निर्माण झाली होती. या विषमतेनं आपल्याच समाजातील अनेक लोकांचा मानव म्हणून जगण्याचा अधिकार हिरावून घेतला होता. अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये मोठी जागृती आणून एक समता युक्त समाज तयार झाला पाहिजे. या भावनेतून या विषमतेलाच आपली शक्ती म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञान संपादित केलं,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वीज मंत्री म्हणून देशात पदभार स्वीकारला. त्यावेळी त्यांनी संपूर्ण भारतामध्ये एक राष्ट्रीय ग्रीड तयार करायचा निर्णय घेतला. भारताच्या कुठल्याही भागात आपल्याला वीज नेता आली पाहिजे. आज आपण पाहतोय या नॅशनल ग्रीडमुळं भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण वीज पोहचवू शकलो. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राला जे लक्षात आलं नाही ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घेऊन आज भारताला स्वयंपूर्णतेकडं नेण्याचा कार्यक्रम आपल्याला दिला. अशा या महापुरुषाचे पुढच्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी इंदू मिल स्मारक पूर्ण व्हावं, असा प्रयत्न आपण करत आहोत,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.







