वृतसंस्था : बांगलादेशमध्ये डेंग्यू व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोग्य विभागाने (DGHS) आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली, ज्यामुळे मृतांची एकूण संख्या २९२ झाली. राजधानी ढाकामध्ये परिस्थिती सर्वात गंभीर आहे, जिथे रुग्णालये लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहेत आणि अनेक भागात बेडची मोठी कमतरता आहे. आरोग्य विभागाच्या मते, अवघ्या २४ तासांत १,१०१ नवीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, ज्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ७३,९२३ झाली आहे.
ढाकाच्या दोन्ही शहर महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. DGHS च्या ताज्या आकडेवारीनुसार, ढाकाच्या उत्तर भागात २४१, दक्षिणेत १७५ आणि बरीशाल, चट्टोग्राम, खुलना आणि राजशाही सारख्या इतर विभागांमध्ये शेकडो रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातही संसर्ग पसरू लागला आहे, ज्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर आणखी ताण आला आहे. गेल्या तीन वर्षातील आकडेवारीवरून असं दिसून येतं की, बांगलादेशात डेंग्यूचा धोका सातत्याने वाढत आहे. २०२३ मध्ये, या आजाराने १,७०५ जणांचा जीव घेतला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. २०२४ मध्ये मृत्यू ५७५ पर्यंत कमी झाले, परंतु २०२५ मध्ये त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. ही फक्त नोव्हेंबरची सुरुवात आहे आणि मृतांची संख्या आधीच २९२ वर पोहोचली आहे.







