मुंबई : मे २०२५ पासून बंद असलेली नेरळ–माथेरान मिनी ट्रेन तब्बल सात महिन्यांनंतर पुन्हा पर्यटकांच्या सेवेत धावणार आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभागाने ६ नोव्हेंबरपासून सेवा सुरू करण्याचे अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.पहिली गाडी सकाळी ८.५० वाजता नेरळहून सुटून ११.३० वाजता माथेरानला पोहोचेल, तर दुसरी गाडी १०.२५ वाजता सुटेल ती दुपारी १ वाजून पाच मिनिटे पोहचेल. माथेरानहून परतीच्या गाड्या अनुक्रमे दुपारी २.४५ वाजता आणि ४ वाजता सुटतील आणि आपल्या वेळेत पोहोचतील. पहिल्या गाडीत विशेष विस्टाडोम कोच लावण्यात आला असून, पर्यटकांना डोंगरदर्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद चोहोबाजूने न्याहाळता येणार आहे.
मे महिन्यात दरडी कोसळल्याने सेवा बंद होती. सप्टेंबरपासून रेल्वे विभागाने दुरुस्ती पूर्ण करून मार्ग पुन्हा सुरळीत केला आहे. या निर्णयाने पर्यटक आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. माथेरानच्या दऱ्यांमधून पुन्हा एकदा ‘हिल क्वीन’चा शिट्टीचा आवाज घुमणार असून पर्यटकांना ही आवडती ट्रेन निसर्गाचा आनंद देणार आहे. दरम्यान, व्यापारी वर्गासाठीही दिलासादायक बातमी आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत मालवाहतूक करणारी विशेष मिनी ट्रेन सेवा नेरळ–माथेरान मार्गावर सकाळी ७ वाजता सुटेल, तर माथेरानहून परतीची ट्रेन दुपारी १२.२५ वाजता सुटणार आहे.
वेळापत्रक खालीलप्रमाणे :
नेरळ–माथेरान डाउन गाड्या
१. ट्रेन क्रमांक ५२१०३ नेरळ येथून ०८.५० वाजता सुटेल आणि माथेरान येथे ११.३० वाजता पोहोचेल (दैनिक)
२. ट्रेन क्रमांक ५२१०५ नेरळ येथून १०.२५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे १३.०५ वाजता पोहोचेल (दैनिक)
माथेरान – नेरळ अप गाड्या
१. गाडी क्रमांक ५२१०४ माथेरान येथून १४.४५ वाजता सुटेल आणि नेरळ येथे १७.३० वाजता पोहोचेल (दैनिक)
२. गाडी क्रमांक ५२१०६ माथेरान येथून १६.०० वाजता सुटेल आणि नेरळ येथे १८.४० वाजता पोहोचेल (दैनिक)







