मुंबई : मतदार याद्यांमधील घोळाबाबत वारंवार तक्रारी करूनही निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करते. कितीही पुरावे दिले तरी त्याची दखलच घेतली जात नाही आणि थातूरमातूर खुलासे केले जातात. मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरांमध्ये मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे आहेत. निवडणूक आयोग अशांना रोखणार नसल्यास दुबार नावे असलेले मतदार मतदानाला आल्यास त्यांना फोडून काढा, असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
मतदार याद्यांमधील घोळाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने मुंबईत शनिवारी ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणावर या वेळी टीका केली. राज ठाकरे यांनी दुबार मतदारांना फोडून व बदडून काढण्याचा आदेशच मनसेच्या कायर्कर्त्यांना दिला. तर ‘मतचोरांना लोकशाही मार्गाने फटकावून काढण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात १३० मतदारांची नोंदणी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. निवडणूक आयोगाचे काय चालले, हेच समजत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. सदोष याद्या आणि मतचोरी करून निवडणुका घेणार असाल तर निवडणुका घ्यायच्या की नाहीत, हे जनतेने ठरवावे. अशा निवडणुका न लढविलेल्या बऱ्या, अशी भूमिका ठाकरे बंधूंनी मांडली.







