मुंबई : फेब्रुवारी २०२६ मध्ये मुंबई क्लायमेट वीक चे (एमसीडब्ल्यू) उद्घाटन सत्र आयोजित केले जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने प्रोजेक्ट मुंबईने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. भारत नेतृत्वाची भूमिका घेऊन, संपूर्ण ग्लोबल साउथमध्ये हवामान बदल विषयक कृतीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनणे हे मुंबई क्लायमेट वीक चे उद्दिष्ट आहे.
एमसीडब्ल्यूबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “हवामान बदलाच्या क्षेत्रात आपण संवादाकडून कृतीकडे जाण्याची वेळ आली आहे. मुंबई क्लायमेट वीक हा एक उत्तम उपक्रम आहे जो केवळ हवामान बदल कमी करण्याच्या प्रयत्नांचा उत्सव साजरा करत नाही तर नागरिक, व्यवसाय आणि संस्थांना कृतीत आणतो. हा कार्यक्रम महाराष्ट्र आणि मुंबईसाठी मापदंड प्रस्थापित करेल आणि आपल्याला प्रेक्षक राहण्यापेक्षा ठोस पावले उचलण्याची प्रेरणा देईल. आम्ही जागतिक समुदायाशी संपर्क साधून एमसीडब्ल्यूला एक जागतिक कार्यक्रम बनवू – जिथे खरोखरच आशा आणि कृती एकत्र येतील.” मुख्यमंत्र्यांनी, आघाडीच्या हवामान तज्ञांसह, कार्यक्रमाची माहिती दिली. ३० हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. ते मुंबईला येऊन शहरातील नेते, राज्यांचे मुख्यमंत्री, नागरी समाज गट, कॉर्पोरेट्स, विद्यार्थी आणि तरुणांसोबत काम करून व्यावहारिक हवामान कृती आराखडा तयार करतील.







