मुंबई : मुंबईच्या उपनगरातील एका महत्त्वाच्या स्थानकाचा कायापालट होणार आहे. गेल्या कित्येत वर्षांपासून जमीन आणि जागेच्या अडचणींमुळं रखडलेल्या उन्नत रेल्वेमार्गाला अखेर गती मिळाली आहे.रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या ४१० मीटर लांबीच्या रॅम्प बांधकामासाठी दोन्ही बाजूंची जागा पूर्णपणे मोकळी झाली आहे. त्यामुळं आता कामाचा वेग वाढणार आहे.
मुंबईच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला हे एक महत्त्वाचे जंक्शन आहे. या स्थानकात नेहमीच मोठी मोठी गर्दी असते. कुर्ला स्थानक हे नेहमीच गजबजलेले असते. या प्रकल्पामुळं कुर्ला स्थानकातील गर्दी कमी होणार आहे. सध्या कुर्ला स्थानकातून साधारण चार ते पाच लाख प्रवासी ये-जा करतात. स्थानकातील अरुंद फलाट आणि जुन्या पादचारी पुलांमुळं प्रवाशांना चालताना मोठा त्रास होतो. यासाठीच हा महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. कुर्ला उन्नत रेल्वेमार्गांतर्गंत १३३९ मीटर लांबीचा उन्नत रेल्वेमार्ग उभारला जाणार आहे. तसंच, या प्रकल्पांतर्गंत कुर्ला-चुन्नाभट्टी दरम्यान एक नवीन उन्नत स्थानक उभारले जाणार. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटीकडील आणि चुन्नाभट्टीकडील दोन्ही बाजूंनी रॅम्पचे बांधकाम एकाचवेळी सुरू होणार आहे. हा प्रकल्प २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या प्रकल्पात नवीन फुटओव्हर ब्रिज, स्कायवॉकसह पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम केले जाणार आहे. कुर्ला-चुनाभट्टी दरम्यान एक नवीन उन्नत स्थानक उभारले जाणार असून या स्थानकात तीन फलाट असतील. त्यापैकी एका फलाटावर पनवेलच्या दिशेला विशेष सुविधा असेल. यामुळं कुर्ला-पनवेल दरम्यान शटल सेवा सुरू करणे शक्य होणार आहे. नवीन स्थानकात तीन स्वतंत्र ट्रॅक असतील त्यातील सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी दुसरा नवी मुंबईकडे जाण्यासाठी तिसरा रूळ हा कुर्ला येथे समाप्त होणाऱ्या गाड्यांसाठी असेल. यामुळं प्रवाशांना विनाअडथळा सेवा मिळण्यास मदत होईल.







