मुंबई : कित्येक वर्षांपासून देशात ओला-उबेरचे साम्राज्य आहे. अॅप आधारित टॅक्सी सेवांची दादागिरी या काही वर्षात वाढली आहे. कधी अचानक भाडेवाढ तर कधी राईड रद्द करणे. तर कधी सर्ज प्रायसिंगच्या नावाने लूट. या अॅप आधारित टॅक्सी फक्त ग्राहकांचीच नाही तर ड्रायव्हरलादेखील मनस्ताप होतो. त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा खासगी कंपन्यांच्या कमीशनमध्ये जातो. मात्र आता लवकरच हे चित्र बदलणार आहे. भारत सरकारने टॅक्सी नावाने देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारत टॅक्सी ही कोणतीही परदेशी कंपनी नाहीये तसंच, कोणतीही कॉर्पोरेट प्रकल्पदेखील नाहीये. तर, ही चालकांची एकप्रकारची संस्था असणार आहे. ही संस्था केंद्रीय सहयोग मंत्रालय आणि नॅशनल ई गव्हर्न्स डिव्हीजनअंतर्गंत विकसित करण्यात येणार आहे. ज्यामुळं देशभरातील चालकांना त्यांच्या मेहनतीचा पुर्ण सन्मान आणि प्रवाशांना खात्रीलायक सेवा मिळणार आहे.
भारत टॅक्सीचे वैशिष्ट्यै म्हणजे यात ड्रायव्हरना त्यांच्या कमाईचा पूर्ण अधिकार मिळणार आहे. त्यांना कंपनीला २०-२५ टक्के कमीशन द्यावे लागणार नाही. त्या व्यतिरिक्त फक्त सदस्यत्वाची नोंदणी द्यावी लागेल. तीदेखील दैनिक, साप्ताहिक किंवा महिन्याला भरावी लागणार. हे मॉडेल पूर्णपणे सहकारी भावनावर आधारित आहे. इथे प्रत्येक सदस्य भागीदार आणि मालक व लाभार्थी असणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, या मॉडेलमुळं फक्त चालकांची आर्थिक सुबत्ता तर वाढणारच आहे पण त्याचबरोबर आत्मनिर्भरतादेखील वाढणार आहे. प्रत्येक टॅक्सीमध्ये जीपीएस ट्रॅकिंग, रीअल टाइम मॉनिटरिंग आणि २४*७ हेल्पलाइन यासारख्या सुविधा असणार आहेत. प्रवाशांना ड्रायव्हरचे नाव, फोटो, वाहन नंबर आणि भाडे बुकिंग करतानाच अॅपमध्ये दिसणार आहेत. भारत टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट नोव्हेंबर २०२५ पासून दिल्लीत सुरू होणार आहे. येथे ६५० टॅक्सी आणि त्यांचे मालक-चालक या मिशनमध्ये सहभागी होती. डिसेंबरमध्ये ही सेवा मुंबई, पुणे, भोपाळ, लखनौ आणि जयपूरसारख्या शहरात सुरू होणार आहे. सरकारचे लक्ष्य आहे की २०२६ पर्यंत भारत टॅक्सीची सेवा सर्व प्रमुख मेट्रो शहरात सक्रीय करावी. २०३० पर्यंत देशभरातील १ लाख चालकांना जोडण्यात यावे. जून २०२५ मध्ये, सरकारने भारत टॅक्सी चालविण्यासाठी सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेडची स्थापना केली. हा उपक्रम ₹३०० कोटींच्या सुरुवातीच्या भांडवलासह सुरू करण्यात आला. त्यावर कोणत्याही खाजगी मालकाचे नियंत्रण राहणार नाही, परंतु प्रत्येक सदस्य चालक सह-मालक असेल.







