वृत्तसंस्था : पाकिस्तानचा ऑलराऊंडर क्रिकेटर आमिर जमाल याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. २९ वर्षीय क्रिकेटरने बुधवारी त्याच्या सोशल मीडियावर एक भावुक संदेश पोस्ट करून एक दुःखद बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.
आमिर जमालने त्याच्या बाळाच्या बोटाला धरलेल्या छोट्या हाताचा फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘देवाची होतीस देवाकडे गेलीस. माझी लाडकी परी, मी तुला जास्तवेळ माझ्या कुशीत घेऊ शकलो नाही. आई आणि बाबांना तुझी खूप आठवण येईल. स्वर्गात तुला सर्वोच्च स्थान मिळो’. आमिर जमालच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी आणि अनेक क्रिकेटर्सनी संवेदना व्यक्त केली. पाकिस्तानची माजी महिला कर्णधार सना मीरने आमिरच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं की, ‘देव तुला आणि तुझ्या पत्नीला हे दुःख सहन करण्याची शक्ती देओ’. आमिर जमालचे जवळचे सहकारी मन्सूर राणा, राय एम. अजलान, प्रणव महाजन आणि उद्योजक हमजा नक्वी यांनीही कमेंट करून संवेदना व्यक्त केल्या.







