मुंबई : मुंबई विभागातील सर्व शाळांना २०२५-२६ साठी यु-डायस प्लस प्रणालीतील शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती २० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून ऑनलाइन सर्टिफाय करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिले आहेत. अवघ्या १२ दिवसांत शिक्षक व शाळा व्यवस्थापनाला डेटा अपडेट करण्याचे आव्हान असणार आहे. मुंबई विभागातील पाचही जिल्ह्यांत मिळून सुमारे ४४ लाख विद्यार्थी शिकत असून त्यांची अद्याप लाखोंची माहिती विविध टप्प्यांवर प्रलंबित आहे.
आधार व्हॅलिडेशन अजून १.१९ लाख विद्यार्थ्यांचे बाकी आहे. सुमारे १.३३ लाख विद्यार्थ्यांची माहिती डेटा एन्ट्रीच्या स्वरूपात अपूर्ण आहे. तब्बल ३.९१ लाख विद्यार्थी अजूनही ड्रॉपबॉक्समध्ये आहेत तर सर्वात गंभीर बाब म्हणजे ९.५४ लाख विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झालेले नाहीत. असे असताना शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मुंबई विभागातील सर्व शाळांना यु-डायस प्लस प्रणालीतील शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती २० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून ऑनलाईन सर्टिफाय करणे बंधनकारक केले आहे. याबरोबरच व्यवस्थापनाचा प्रकार, शिक्षण माध्यम, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, शाळा आराखडा, आपत्ती व्यवस्थापन योजना, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह, आरोग्य तपासणी, इको क्लब यांसारख्या घटकांची पडताळणी नीट झालेली पाहिजे. शिक्षकांची माहिती यु-डायस प्रणालीत नीट भरलेली असून त्यांचे आधार शंभर टक्के व्हॅलिडेट झाले आहेत का, हे तपासणे गरजेचे आहे. जिल्हानिहाय पाहता ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ३.६१ लाख अपार पेंडिंग आहेत, तर मुंबई उपनगरात १.८२ लाख, पालघरमध्ये १.४८ लाख, मुंबई शहरात १.४५ लाख आणि रायगडमध्ये १.१५ लाख विद्यार्थी अद्याप प्रलंबित आहेत. पालघरमध्ये ३१ हजारांहून अधिक विद्यार्थी अजून आधार व्हॅलिडेट झालेले नाहीत, तर मुंबई उपनगरात ३५ हजार आणि रायगडमध्ये १५ हजार विद्यार्थी अशाच अवस्थेत आहेत.
डेटा एन्ट्री आणि ड्रॉपबॉक्सच्या आकडेवारीवरही नजर टाकल्यास मुंबई शहरात १.२० लाख विद्यार्थी अजून ड्रॉपबॉक्समध्येच आहेत. तर ठाणे जिल्ह्यात १.३३ लाख विद्यार्थ्यांची नोंद बाकी आहे. ३० सप्टेंबरनंतर शाळा मान्यता आणि विद्यार्थ्यांच्या नोंदींसाठी याच प्रणालीचा आधार घेतला जाणार असल्याने पुढील शैक्षणिक प्रक्रिया अडचणीत येऊ शकते. त्यामुळे दोन आठवड्यांत काम पूर्ण करणे शिक्षकांना अत्यावश्यक असणार आहे.







