मुंबई : कबुतरांना दाणे खायला घालण्याबाबत कोणताही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे, असे असतानाही कबुतरांना खाऊ घालणाऱ्या आणि याप्रकरणी कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीविरोधात फौजदारी तक्रारी दाखल करा, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी महापालिकेला दिले.
या न्यायालयीन आदेशाचा चुकीचा अर्थ काढू नये, नागरिकांच्या आरोग्यापेक्षा महत्त्वाचे काहीही असू शकत नाही, असेही न्यायमूर्ती. गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश देताना स्पष्ट केले. त्याचवेळी मुंबईतील कबुतरखान्यांवरील पाडकाम कारवाईस दिलेल्या अंतरिम स्थगितीचा आदेश पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवला. कबुतरखान्यांजवळ कबुतरांना कोणी खाणे किंवा दाणे घालणार नाही याची खात्री करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेशही न्यायालयाने महापालिकेला दिले. मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने महापालिकेने याप्रश्नी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.







